उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर हिंदी विभागातील प्रा. प्रवीण जाहूरे यांचे व्याख्यान प्राध्यापक प्रबोधिनीअंतर्गत आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा. प्रवीण जाहूरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आणि विचारांचा सविस्तर आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. बहुजन समाजातील कुटुंबांमधील पहिल्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना सुशिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. सन १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली, तर संस्थेची नोंदणी १९३५ मध्ये झाली. लोकसहभागातून शिक्षणाची प्रक्रिया व्यापक व्हावी, या प्रेरणेतून कर्मवीरांनी समाजातील विविध घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी अध्यापक विद्यालयाची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून ‘मुष्टीदान योजनेच्या’ माध्यमातून अन्नधान्य जमा करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून शिक्षण हे केवळ शासन किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून रुजविला. रयत शिक्षण संस्थेमुळे पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि त्याचा परिणाम त्या भागाच्या सामाजिक व आर्थिक विकासावरही झाला. शिक्षणाबरोबरच शेती, पशुपालन आणि श्रमाधारित प्रशिक्षण समाजासाठी आवश्यक आहे, हे ओळखून कर्मवीरांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि वसतिगृहे यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतही शिक्षणाचा विस्तार केला. रयत शिक्षण संस्थेने केवळ विद्यार्थी घडविले नाहीत, तर शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनाही घडविले. त्यातील अनेकांनी पुढे विद्यापीठांच्या कुलगुरूपदांसह विविध महत्त्वाच्या शैक्षणिक पदांवर कार्य करून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना काम करत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच श्रमाची प्रतिष्ठा, स्वावलंबन आणि आर्थिक शिस्त यांचे महत्त्व समजले. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी झाले, असे प्रा. जाहूरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. के. मस्के म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा समानार्थी शब्द म्हणजे ‘समर्पण’ होय. ‘शिक्षण हेच कर्म आणि सेवा हाच धर्म’ हा कर्मवीरांच्या आयुष्याचा मुख्य हेतू होता. त्यांच्या शैक्षणिक विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजच्या पिढीसाठीही महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस. आर. सोमवंशी यांनी मानले.
No comments:
Post a Comment