उदगीर - महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश महादप्पा मुद्दा यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उदयगिरी परिवारातर्फे आयोजित या सोहळ्यात महेश मुद्दा यांच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्था सदस्य प्रा. आडेप्पा अंजुरे, भीमाशंकर मुद्दा, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा आंबरखाने, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सत्काराला उत्तर देताना महेश मुद्दा म्हणाले की, “आपल्या माणसांकडून मिळणारा सन्मान हा सर्वात मोठा असतो. प्रत्येक यशामागे प्रेरणा आवश्यक असते. यशानंतर समाजासाठी काम करणे हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना हार्डवर्क, हंबलनेस आणि ह्युमॅनिटी या ‘तीन एच’चा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले की, “यशस्वी व्यक्तींच्या यशाकडे न पाहता त्यांनी संकटांवर कशी मात केली, याचा अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे. यश मिळवणे हाच जीवनाचा ध्यास असला पाहिजे.”
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महेश मुद्दा यांनी सविस्तर उत्तरे देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. एस. होकरणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. सायली कुलकर्णी हिने केले.
No comments:
Post a Comment