उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी पंधरवड्यानिमित्त पदव्युत्तर व संशोधन केंद्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र, उदगीर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथील प्रा. डॉ. धनराज बिरादार उपस्थित होते. मंचावर सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक एस. मिश्रा, प्रबंधक विकास जागींड, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे उपस्थित होते.
यावेळी बसवराज पाटील नागराळकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “भाषा ही माणसांना जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी बहुभाषिक होऊन आपले व्यक्तिमत्त्व घडवावे.” प्रमुख पाहुणे मिश्रा म्हणाले, “प्रादेशिक भाषांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य हिंदी भाषा करते. इतर भाषांतील अनेक शब्द आत्मसात केल्यामुळे हिंदी भाषा अधिक समृद्ध आणि सार्वत्रिक झाली आहे.” प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुझ्यासाठी’ हा आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना सामाजिक भान देणारी बिन भिंतीची शाळा आहे. ”हिंदी वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी नाझिया पठाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. रेवती डोंगरे हिने द्वितीय, तर हावगीस्वामी महाविद्यालयातील क्षितिजा नळगीरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थिनींना संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. महादेव नौबदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सिद्धेश्वर लांडगे आणि प्रा. शिवनंदा रोडगे यांनी काम पाहिले. भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्या सय्यदा माहीन आणि शेख महेक यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे यांनी मांडले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. पी. चनाळे तर आभार प्रा. डॉ. पुष्पलता काळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टे, प्रा. डॉ. सुनंदा भद्रशेट्टी, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर आणि प्रा. प्रवीण जाहुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment