उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज व विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करून झाली. यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक चळवळीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात चामले यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक म्हणून सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा नूतन स्टाफ रूमचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. उमाटाळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयात दीर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच सेवकवर्गाचा यावेळी शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या विकासात आणि जडणघडणीत योगदान देणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम, त्याकाळातील तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती तसेच स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देताना नव्या पिढीने या इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात 'वृक्षारोपणाचा कार्यक्रम' घेण्यात आला. उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुक्तिसंग्रामाच्या स्मृतींसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागनाथ खांडेकर यांनी केले, तर प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, संस्था सदस्य अॅड. अजय दंडवते, डॉ. श्रीकांत मध्वरे, शिवराज वल्लापुरे, प्रा. आडेप्पा अंजुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment