उदगीर- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक-शिक्षक संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य अॅड. अजय दंडवते, भीमाशंकर मुद्दा, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपे, पर्यवेक्षक प्रा. तिरुपती सगर तसेच पालक प्रतिनिधी जावेद बशिरुद्दीन शेख यांची उपस्थिती होती. यावेळी पालक प्रतिनिधी जावेद बशिरुद्दीन शेख आणि कांचन मोरे यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच एमएच-सीईटी आणि पूर्वज्ञान चाचणीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षेसाठी उत्कृष्ट प्रश्नसंच तयार करणारे प्रा. शैलेश बिरादार, प्रा. संदीप मजगे, प्रा. अश्विन वळवी आणि प्रा. प्रवीण जाहुरे यांचाही ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले की, अकरावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा आणि उपक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा.
अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद घेत अभ्यास करावा. पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून त्यांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांनी केवळ घोकंपट्टी न करता विषयातील संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा आणि यशाचा संकल्प करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माहिती व प्रात्यक्षिके डॉ. के. नाईक, पी. कांबळे, डॉ. सुरेंद्र आणि डॉ. शेख यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. संजय मुडपे यांनी केले. प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून अकरावी व बारावीच्या दोन वर्षांच्या कालावधीचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. नागनाथ खांडेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले, तर आभार प्रा. प्रसाद जालनापुरकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment