उदगीर- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या सत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बंकट कांबळे तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. लेखन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथप्रदर्शनासही भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रंथप्रदर्शनात अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले निवडक साहित्य, त्यांच्या साहित्याच्या समीक्षा-चरित्राचा समावेश होता. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेचे सदस्य ग्रंथप्रदर्शनाला भेट देत वाचनाचा आनंद घेतला.
दुपारच्या सत्रात प्रा. मंदावाड यांनी आंबेडकरी विचार, साहित्य आणि सामाजिक चळवळींचा आढावा घेतला. अण्णा भाऊ साठे यांच्या विस्तृत साहित्याकृत्या (35 कादंबरी, शेकडो कथा, प्रवासवर्णने, लोकनाट्ये) ला त्यांनी आंबेडकरी विचारांचा महत्त्वाचा आधार मानले. साठे यांच्या कथांच्या नायका समाजातील अन्यायाची लढाई लढणारे दाखवले आहेत; त्यांच्या लेखनातून मिल कामगार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळींचे प्रतिबिंब दिसते. टिळकांविषयी मंदावाड म्हणाले की त्यांनी शैक्षणिक चळवळ (न्यू इंग्लिश शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी), केशरी–मराठा माध्यमातून राजकीय आघाडी घेतली, होमरुल व स्वराज्य-स्वदेशीचा प्रचार केला आणि अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांनी टिळक, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांमधील साम्य–असम्य मुद्दे उलगडले. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी साठे यांच्या साहित्यात जातीधर्माच्या भिंती मोडून समाजकार्य करण्याचा संदेश असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. जी. जेवळीकर यांनी केले; आभारप्रदर्शन प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी केले.
No comments:
Post a Comment